मुख्य बातमी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीची विशेष फेरीबोट सेवा महिनाभर बंद राहणार 

दापोली : सुरू होत असलेल्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार विविध ठिकाणच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय सुवर्णदुर्ग शिपिंग ॲण्ड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे दाभोळ-धोपावे, जयगड-तवसाळ आणि वेसवी-बागमांडले या मार्गांवरील रात्रीची अतिरिक्त फेरी सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सुचनेनुसार, १५ जून व ३१ जुलै या कालावधीत संबंधित मार्गांवरील रात्रीच्या वेळेतील जादा फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील. पावसाळ्यात समुद्र आणि खाडयांमधील बदलते हवामान, वाढलेला वारा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कोकणातील दाभोळ-धोपावे, जयगड-तवसाळ आणि वेसवी-बागमांडले हे फेरीबोट मार्ग स्थानिक नागरिक, व्यावसायिक, पर्यटक तसेच मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. विशेषतः रात्रीच्या जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होत होती. मात्र पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यान, नियमित वेळापत्रकानुसार सुरू असलेल्या इतर फेरी सेवांबाबत स्वतंत्र सूचना लागू राहतील. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुवर्णदुर्ग शिपिंग ॲण्ड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या 9767248900 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!