कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात रविवारी ठाकर चित्रकथी कलाकार बाळकृष्ण मसगे ओरोस येथे रसिकांशी साधणार संवाद

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या जुलै महिन्याच्या कार्यक्रमात रविवारी (२६ जुलै) सायंकाळी ५ वाजता संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्लाखान राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त ठाकर लोककला कलावंत बाळकृष्ण गणपत मसगे रसिकांशी संवाद साधणार आहेत. ओरोस खर्येवाडी (जैतापकर कॉलनी) येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाचा हा सतरावा मासिक कार्यक्रम आहे. दशावतार, चित्रकथी, भजन वगैरे लोककला हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन वारसा आहे. कुडाळजवळच्या गुढीपूर पिंगुळी येथील ठाकर समाजाच्या लोककलांनी जागतिक ख्याती मिळवली आहे. चित्रकथी, कळसूत्री, लेदर पपेट्स, पांगुळबैल यासारख्या कलांना लोकाश्रय आणि राजाश्रयही मिळालेला आहे. पिंगुळी येथील श्री. बाळकृष्ण गणपत मसगे याना नुकताच अत्यंत प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिसमिल्लाखान युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे पिताजी श्री. गणपत मसगे हेसुद्धा ख्यातनाम लोककलाकार आहेत.

यानिमित्ताने श्री. मसगे यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते ‘ठाकर लोककला’ या विषयावर संवाद साधणार आहेत. ठाकर लोककलेचा इतिहास, विविध प्रकार, लोककला आणि विधींचा परस्परसंबंध, बाहुल्या आणि चित्रे बनविण्याची पद्धत, कालानुसार झालेले बदल, ठाकर समाजाच्या चालीरीती, परंपरा, समस्या याविषयी ते बोलतील आणि काही सादरीकरणही करतील.

बाळकृष्ण गणपत मसगे हे लोककला, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे युवा कलावंत आहेत. त्यांनी मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून बी.एफ.ए. (बॅचलर ऑफ फाईन आर्टस्) ही पदवी संपादन केली. त्यानंतर जवळपास दहा वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीत आर्ट डायरेक्टर म्हणून कार्य करत आपल्या कलात्मक प्रतिभेची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील पारंपरिक कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी आणि चामड्याच्या बाहुल्या या दुर्मिळ लोककलांच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत आहेत. या लोककलेत त्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करून या लोककलांना संजीवनी दिली आहे. आपले वडील गणपत सखाराम मसगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतभर या लोककलांचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांच्या पुढाकारातून पिंगुळी येथे ‘ठाकरवाडी म्युझियम’ या आगळ्यावेगळ्या आदिवासी पुरातन वस्तुसंग्रहालयाची निर्मिती झाली.

या कार्यक्रमाला कुटुंबीय, परिवार, मित्रमंडळी यांच्यासह उपस्थित राहावे. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!