महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने बुधवारी राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकच्या घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मेघगर्जनेसह पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने घाटमाथा भागातील नागरिकांना तसेच नदी-नाल्यांच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!