कोकणनगरवर अन्याय सहन करणार नाही; रत्नागिरी शहरभरातील अवैध गाळे-टपऱ्या हटविण्याची केतन शेट्ये यांनी केली जोरदार मागणी

रत्नागिरी : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या कौन्सिल सभेत शहरातील अनधिकृत गाळे आणि टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत, “अनधिकृत टपऱ्या फक्त कोकणनगरमध्येच आहेत का? शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?” असा थेट सवाल उपस्थित केला.
केतन शेट्ये यांनी सभागृहात सांगितले की, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभसह शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्या व गाळे उभे आहेत. मात्र कारवाई केवळ कोकणनगर परिसरापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. हा प्रकार कोकणनगरवासीयांवर अन्याय करणारा असून प्रशासनाने सर्वांना समान न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी त्यांनी नगर पालिकेने ९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीची आठवण करून दिली. त्या जाहिरातीत अनधिकृत गाळे, टपऱ्या तसेच दुकानांसमोरील वाढीव छप्परे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचनांनुसार शहरभर प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
शहरातील सर्व भागांतील अनधिकृत गाळे व टपऱ्यांवर एकसमान आणि कठोर कारवाई करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी केतन शेट्ये यांनी केली.
दरम्यान, या चर्चेनंतर नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी प्रशासनाला १५ ऑगस्टपूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व अनधिकृत गाळे व टपऱ्यांवर कारवाई पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच यासंदर्भातील ठरावही सभेत मंजूर करण्यात आल्याने शहरातील अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



