साफसफाई करताना सर्पदंशाने रत्नागिरी पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ लक्ष्मण गोताड (मूळ रा. चांदोर, सध्या रा. फगरवठार, परटवणे, ता. जि. रत्नागिरी) हे रत्नागिरी नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २ ऑगस्ट रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळपासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून पटांगण परिसराची स्वच्छता आणि साफसफाईचे काम सुरू होते.
याचवेळी स्वच्छतेचे काम करत असताना काशिनाथ गोताड यांच्या पायाला फुरसे जातीच्या महाविषारी सापाने दंश केला. सर्पदंश होताच ते जागीच कोसळले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
कर्तव्य बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडलेल्या या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त होत असून, काशिनाथ गोताड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची पुढील नोंद संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.


