आंबा घाटात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा

रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटातील रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ३१ जुलै २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत या मार्गाचे चौपदरीकरण सुरू असून, सततच्या मुसळधार पावसामुळे कि.मी. ६९.५०० ते ६९.६०० दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित ठिकाणी सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता NHAI च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना आंबा घाटातून वाहतूक करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच हलकी प्रवासी वाहने आवश्यक ती खबरदारी घेत आणि नियंत्रित वेगाने या मार्गावरून प्रवास करू शकतील.
अवजड वाहनांसाठी रत्नागिरी – हातखंबा – पाली – अणुस्कुरा घाट – राजापूर/कोल्हापूर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून, आवश्यकतेनुसार भुईबावडा किंवा फोंडा घाट मार्गाचाही वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक ठिकाणी इशारा फलक, रिफ्लेक्टीव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश देण्यात आले असून, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर किंवा संबंधित व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


