आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार खते; ‘एफएफएस’ ॲपद्वारे होणार खतांची विक्री

रत्नागिरी : खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद करण्यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (एफएफएस) हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आता घरबसल्या स्वतःच्या गरजेनुसार खतांची आगाऊ नोंदणी करू शकणार असून, दुकानात फक्त क्यूआर कोड किंवा टोकन दाखवून त्यांना तत्काळ खत मिळणार आहे. त्यामुळे खतांसाठी दुकानांसमोर तासनतास रांगेत उभे राहण्याचा त्रास आता कायमचा संपणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर, आता २५ ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्ह्यातही ही व्यवस्था लागू होत असून यापुढे संपूर्ण जिल्ह्यात केवळ या ॲपद्वारेच खतांची विक्री केली जाणार आहे.

या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनेक मोठे फायदे होणार आहेत. ॲपमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकाचा प्रकार नोंदवताच प्रणाली स्वतः शास्त्रीय पद्धतीनुसार आवश्यक खत मात्रेची (GFR) शिफारस करते. शेतकरी आपल्या पसंतीनुसार परिसरातील कोणत्याही अधिकृत परवानाधारक विक्रेत्याची निवड करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतांचा गैरकृषी वापर आणि काळाबाजार रोखण्यास यामुळे मोठी मदत होणार असून अनुदानित खत केवळ गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचणार आहे. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी आणि युरियाचा अतिवापर टाळण्यासाठी शासनाने प्रति शेतकरी, प्रति हेक्टर, प्रती हंगाम (खरीप व रब्बी) जास्तीत जास्त ५ गोण्या युरिया आणि ४ गोण्या डीएपी खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे.

गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप मोफत उपलब्ध असून ते वापरण्यासाठी इंटरनेट असलेला स्मार्टफोन आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ॲप उघडून राज्य निवडल्यानंतर फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीद्वारे लॉगिन करता येते. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, त्यांची जमिनीची माहिती आपोआप उपलब्ध होते, तर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना कुळ किंवा मालकी हक्क निवडून सर्व्हे नंबरसह जमिनीचा तपशील भरावा लागतो. यानंतर पिकाची निवड करून आवश्यक खतांचे प्रकार व गोण्यांची संख्या ठरवता येते. खत खरेदीसाठी स्वतः जाणार की प्रतिनिधीला पाठवणार, याची नोंद करून जवळच्या दुकानाची निवड करावी लागते. नोंदणी पूर्ण होताच तयार होणारा क्यूआर कोड आणि टोकन नंबर सुरक्षित सेव्ह करून खत खरेदीच्या वेळी दाखवावा लागतो.

खत आणण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःचे मूळ आधार कार्ड आणि बुकिंगचा क्यूआर कोड असणे बंधनकारक आहे, तसेच ओटीपी मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असल्याची खात्री करावी.

ॲप संदर्भातील माहिती, मार्गदर्शन अथवा तक्रारींच्या निवारणासाठी कृषी विभागामार्फत तालुकानिहाय हेल्पडेस्क सुरू करण्यात आले आहेत. शेतकरी रत्नागिरी तालुक्यासाठी राजेंद्र कुंभार (९४२३०४७४६६), राजापूरसाठी विद्या तिष्टक (९१८४२०८०६४), लांजा तालुक्यासाठी सुभाष गुरव (९४२२६७९५४६), चिपळूणसाठी भीमाशंकर कोळी (९४२१५९९८००), गुहागरसाठी कपिल चिंगळे (९१८४२०८१४०), संगमेश्वरसाठी चंद्रकांत कोळी (९४०३७७२८०४) व पी. एस. सुर्वे (८८०६४९९७०८), दापोलीसाठी वर्षा गोरीवले (९१८४२०८१५७) व श्वेता शिंदे (८३०८४१५०२७), खेड तालुक्यासाठी जगदीश शिंदे (९१८४२०८१८८) तसेच मंडणगड तालुक्यासाठी घनश्याम अभंग (८२७५४६५९४५) या गुण नियंत्रण निरीक्षकांशी संपर्क साधू शकतात. अधिक माहितीसाठी जवळच्या खत विक्रेत्यांशी किंवा तालुका व मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!