मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव उत्साहात

शिक्षणासोबत भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन; शिक्षकांच्या उपक्रमाचे संस्थेसह पालकांकडून कौतुक

राजापूर : आधुनिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांविषयीची माहिती व जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरातील राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम आंबेवाडी स्कूलमध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेत विविध हिंदू सण-उत्सव साजरे करून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून दिली जाते. बदलत्या आधुनिक जीवनशैलीत विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून ठेवावी तसेच विविध सणांचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घ्यावे, यासाठी शाळेकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले.

दहीहंडी उत्सवानिमित्त शाळेच्या मैदानात आकर्षक पद्धतीने छोटी दहीहंडी बांधण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ‘गोविंदा रे गोपाळा’ या गीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटतानाच विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाशी निगडित गोपाळकाला उत्सवाचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.

राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेषतः हिंदू सण पारंपरिक पद्धतीने साजरे करून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्यामध्ये संस्कृतीप्रती आदर आणि आपुलकी निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षकांचे संस्था पदाधिकारी तसेच पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!