मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पाणी टंचाईमुळे लोटे एमआयडीसीतील उद्योग ठप्प होण्याची भीती

खेड : लोटे औद्योगिक वसाहत आणि पंचक्रोशीतील १९ गावांवर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर पुढील ४८ तासांत अनेक उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता असल्याची भीती लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी व्यक्त केली आहे.

लोटे एमआयडीसीतील उद्योग भवन येथे काल (१९ जून) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव राजकुमार जैन, संचालक राजेश तिवारी, किसन चव्हाण तसेच घरडा कंपनीचे व्यवस्थापक आर. सी. कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आंब्रे म्हणाले की, सध्याच्या गंभीर परिस्थितीत औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या बैठकीला जलसंधारण विभाग, एमआयडीसी, जिल्हा परिषद तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. लोटे औद्योगिक वसाहतीतील सुमारे २० हजार कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी किमान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्यावर जवळील धरणातून टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आंब्रे यांनी सांगितले.

सध्या लोटे एमआयडीसीचा पाणीपुरवठा मुख्यत्वे कोयना धरणाच्या अवजलावर अवलंबून आहे. मात्र या व्यवस्थेला पर्यायी स्रोत उभारण्याची गरज असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले. वाशिष्ठी नदीवरील फरशी तिठा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही सहा ते सात वर्षे उलटली तरी विविध शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याच्या भीतीमुळे या प्रकल्पाला विरोध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्याची परिस्थिती कोविड लॉकडाऊनपेक्षाही अधिक गंभीर असल्याचे सांगताना आंब्रे म्हणाले की, उद्योग बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असून हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. गॅसच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे आधीच कंत्राटी कामगारांची संख्या कमी झाली असताना आता पाणीटंचाईमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

घरडा कंपनीचे व्यवस्थापक आर. सी. कुलकर्णी यांनी सांगितले की, पाण्याअभावी कंपनीने सुमारे ८० टक्के उत्पादन बंद केले असून केवळ २० टक्के कर्मचारी अत्यावश्यक कामांसाठी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. उद्योगांनी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोळकेवाडी धरणातून पाइपलाइनद्वारे पाणी आणून वाशिष्ठी नदीलगतच्या विहिरींमध्ये सोडण्याचा पर्याय शासनाने तातडीने राबवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच लोटे औद्योगिक वसाहत, खेड तालुका आणि पंचक्रोशीतील गावांवर ओढवलेल्या पाणीबाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उद्योजकांनी केली.

दरम्यान, लोटे पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असून परिसरातील बहुतांश जलस्रोत आटल्याने नागरिकांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे राज आंब्रे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!