कॉपी प्रकरणात दहावीचा रकाना यंदाही निरंकच
गैरप्रकारमुक्त परीक्षेची संस्कृती रुजविणारे कोकण विभागीय मंडळ

रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार मागील पाच परीक्षेत आढळून आला नव्हता. यंदाही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळापैकी रत्नागिरीच्या या मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकायानें रुजवली आहे. तर बारावी परीक्षेत रत्नागिरीत एका कॉपी प्रकाराची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत रत्नागिरी येथील कोकण विभागीय मंडळ हे रत्न गिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सन २०१२ पासून कार्यरत असून या विभागीय मंडळात नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी परीक्षेच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी गैरमार्ग निव्वळ एक प्रकरण भरारी पथकाचे निदर्शनास आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले नाही.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमातील कॉपी विरोधी अभियान या कृतीकार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी या मंडळाकडून पार पाडल्याचे दिसून आले. इयत्ता इ. १० वी व इ.१२वी च्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडणे हे आव्हान मंडळासमोर होते.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त एस. पी. सिंग, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन मोलाची ठरले आहे. तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी दक्षता समिती अंतर्गत भरारी पथकांची निर्मिती करुन प्रत्यक्ष केंद्रांवर राबविलेला धडक कृती कार्यक्रम, प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची मोलाची साथ व त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी घेतलेले विशेष परिश्रम यामुळेचे हे अभियान यशस्वीपणे पार पडून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
चालू वर्षी रत्नागिरी दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. देवेद्र सिंह व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. रत्नागिरी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. सिंधुदुर्ग कविता शिंपी यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी उल्लेखनीय काम काम केले आहे.



