मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचा धोका कायम

भलामोठा दगड मध्येच पडला मात्र अनर्थ टळला

राजापूर : दरड कोसळण्याचा नेहमीच धोका असलेल्या अणुस्कुरा घाटात आज (२६ मे) एक मध्यम स्वरूपातील दगड रस्त्यावर येऊन पडला होता; मात्र स्थानिक ग्रामस्थांनी वाहन चालकांच्या सहकार्याने तो दगड तात्काळ हटविला. या दरम्यान घाटातील वाहतूक सुरळीत सुरू होती.

अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी अनुकूल वाटत असला तरी केव्हा दरड कोसळेल याचा काही नेम नाही अशी स्थिती आहे. त्याचे प्रत्यंतर अधून मधून येत असते. मागील वर्षी भली मोठी दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वेळीच हटवून घाटमार्गे वाहतूक पूर्ववत सुरू केली होती.

पावसाळा सुरू व्हायला काही दिवस बाकी असले तरी गेल्या काही दिवसांपासून मान्सून पूर्व पाऊस बरसत आहे. रविवारी मध्यरात्री  अणुस्कुरा घाटात एक दगड रस्त्यावर येऊन पडला. मात्र त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांना त्याची माहिती मिळताच त्यांनी घाटात धाव घेतली होती. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घाटातून सुरू असलेल्या वाहन चालकांच्या मदतीने तो दगड हटवून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती.

अणुस्कुरा घाटात मोठी दरड कोसळली नसली, तरी दरडी कोसळण्याचे प्रकार अद्याप कायम घडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. संबंधित विभागाला आगामी पावसाळ्यात अणुस्कुरा घाटावर कायम लक्ष ठेवून रहावे लागणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून अणुस्कुरामार्गेच कोल्हापूर, पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी आणि तिकडून येणारी वाहतूक सुरू आहे. दिवसागणिक ती अधिक वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात घाट कसा सुरळीत आणि सुरक्षित राहील याची मोठी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर येऊन ठेपली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!