टेरव (ता. चिपळूण) राधाकृष्ण वाडी, आयोजित कबड्डी स्पर्धेत कळकवणे क्रीडा मंडळ विजेता
काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघ उपविजेता

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत राधाकृष्ण क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत कळकवणे क्रीडा मंडळ विजेता, तर काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धा ८ ते १० मे या कालावधीत कै.बाबुराव दादाजीराव कदम क्रीडा नगरीत राधाकृष्ण मंदिरा समोर झाल्या.
ही स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात आली. यात २० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन अजित कदम, टेरवच्या उपसरपंच सौ. रिया म्हालीम व वाडीतील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते ८ मे रोजी करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या कळकवणे क्रीडा मंडळाला कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणार्थ अजित कदम यांजकडून १० हजार रुपये रोख आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघास (कै.) सौरभ कदम यांच्या स्मरणार्थ सुहास कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्याकडून ७५०० रुपये रोख आकर्षक चषक देण्यात आले.
केदारनाथ, आडरे व केदार वाघजाई, कोळकेवाडी या दोन्ही उपांत्य विजयी संघास (कै.) रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ अशोक कदम व (कै.) महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ नीलेश कदम यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार व आकर्षक चषक देण्यात आले. काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघाचे राकेश मोडक यांस उत्कृष्ट चढाईपटू म्हणून (कै.) अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ प्रशांत मोरे आणि बंधू यांनी, कळकवणे क्रीडा मंडळाचे सोहम कदम यांस उत्कृष्ट पकडीसाठी (कै.) सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ स्वप्नील कदम यांनी, याच संघातील संकेत घडशी यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून (कै.) दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ विनय कदम, तर कुलस्वामिनी धामणवणे (उंडरेवाडी) या संघास शिस्तबद्ध संघास (कै.) राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ रूपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.सर्वोत्कृष्ट खेळाडूस कुलर भेट देण्यात आला.
बक्षीस वितरण दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, अजितराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार, गोपीचंदराव, अनिलराव, संभाजीराव, अनंत साळवी, अशोकराव, भाऊराव, विश्वासराव, अशोकराव या मान्यवरांच्या शुभहस्ते १० मे रोजी करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांसाठी २५ सन्मानचिन्हे (कै.) सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ मानसिंगराव कदम यांनी प्रायोजित केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाडीतील सर्व अबाल वृद्धांनी अपार मेहनत घेतली. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहाय्य करून संस्थेस उपकृत केले. स्पर्धेचे नियोजन व समालोचन चंद्रकांत मोरे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएनचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी केले.


