Uncategorized

गोळवली (संगमेश्वर) परिसरात भूस्खलन

संगमेश्वर : मुसळधार पावसामुळे गोळवली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना काल (१६ जून) पहाटे घडली. जानू गंगाराम करंडे, महादेव भागोजी करंडे आणि गणू करंडे यांच्या मालकीच्या डोंगराचा मोठा भाग खचल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूस्खलनामुळे ताम्हण कोंड पऱ्याला नदीसारखा प्रवाह निर्माण होऊन धरणाच्या स्वरूपाचे दृश्य निर्माण झाले. परिणामी, गोळवली वाड्यांकडे जाणारा मुख्य कॉजवे पूर्णपणे बंद झाला आहे.

कुंभारखाणी, करजुवे, धामापूर व संगमेश्वर मार्गावरही झाला असून हे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आपत्तीत अमोल लोध यांच्या बागेतील सुमारे ८० सुपारी झाडे जमीनदोस्त झाली असून त्यांची विहीर ही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी श्री. तांबटकर, ग्रामसेवक श्री. जाधव, सरपंच शालिनी पथये, पोलीस पाटील आप्पा पाध्ये व उपसरपंच उदय दुधम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

सध्या कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिकांना सतर्क राहण्याचे तसेच डोंगरकडील भागांपासून दूर राहण्याचे व आवश्यकतेशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!