मुख्य बातमी

दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात 

कोकण मंडळात पहिल्या दिवशी गैरप्रकाराची नोंद नाही

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षेला आजपासून (२० फेब्रुवारी) सुरुवात झाली. आज कोकण विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही.

१८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळातील रत्नागिरी जिल्ह्यातून १७,४५०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८, ३२७ असे एकूण २५, ७७७ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. ही परीक्षा एकूण ११४ मुख्य परीक्षा केंद्रांवर होणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ७३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ केंद्रांचा समावेश आहे, तर एकूण ६४० शाळांचा समावेश आहे.

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी कोकण विभागीय मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. सकाळ सत्रात स. १०.३० वाजण्यापूर्वीच परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर हजर झाले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ठिकठिकाणी स्वागत झाले.

गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यात परीक्षा केंद्र इतकी बैठकी पथके नियुक्त करण्यात आली आहे. तर दोन्ही जिल्ह्यात सात भरारी पथके कार्यरत होती.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे केंद्रांवरील परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे, शिवाय रेकॉर्डिंग जतन करण्याच्या सूचना केंद्रसंचालकांना दिलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे ही उत्तम नियोजन असल्याने सुरळीत परीक्षा पार पडत असल्याचे कोल्हापूर मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!