कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

येत्या काही दिवसांत ‘मविआ’चे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील : सुनील तटकरे

रायगड : “महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी येत्या काही दिवसांत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करतील,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यासह रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप, श्रेयस जगताप, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जिल्हा परिषदचे माजी सभापती नारायण डामसे, माजी सभापती जयवंतीताई हिंदूळा आदींसह कर्जत तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्याप्रसंगी खासदार तटकरे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, प्रदेश उपाध्यक्ष कप्तान मलिक, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, रायगड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती उमाताई मुंडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार तटकरे म्हणाले, रायगड जिल्ह्यात एक वलय निर्माण करण्यात माणिकराव जगताप हे यशस्वी झाले आहेत. महाड – पोलादपूर इथल्या जनतेने त्यांच्यावर भरपूर प्रेम केले आहे. माझ्या लोकसभा निवडणुकीत स्नेहल जगताप हिने मला मदत केली नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत माझी मदत स्नेहल जगताप यांना झाली नाही. देशात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर लोककल्याणकारी कामे आपण करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराने आज अनेक लोक पक्षासोबत जोडली जात आहेत. सामाजिक समतेचा हुंकार ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या भूमीत काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुमच्या पाठीशी उभी केली जाईल, असा शब्द तटकरे यांनी दिला.

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघात ९२ हजार मते मिळाली; परंतु मला विजयापर्यंत जाता आले नाही. मात्र ज्यांनी संधी दिली आणि ज्यांनी विरोधात काम केले त्यांचे आभार महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मानले. तळा, म्हसळा या तालुक्यांचा विकास ज्यापध्दतीने केला जात आहे त्याचपध्दतीने महाड – पोलादपूरचा विकासही तटकरेसाहेबांनी करावा, अशी अपेक्षा स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी माझे वडील पक्षाचे सदस्य होते. आज मला या कुटुंबात परत आल्याचे समाधान वाटत असल्याचे स्नेहल जगताप म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!