आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे १८ मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील नाविन्यपूर्ण शेतकऱ्यास शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी जाहीर केले असून त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या संबंधित संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा संचालक, विस्तार शिक्षण यांच्या कार्यालयाकडे सहभाग नांदवावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेत प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे १८ मे रोजी निवड झालेल्या शेतकऱ्याचा भव्य समोरोहात सत्कार करण्यात येणार आहे.

जे शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, विद्यापीठ शिफारसींचा अवलंब, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ज्ञान प्रसाराच्या माध्यमातून कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात लक्षणीय योगदान देतात, त्या शेतकऱ्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल, इच्छुक शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील फॉर्म डाऊनलोड करून आवश्यक माहिती भरावी. पात्र शेतकऱ्यांनी आपले जीवनवृत्त (बायोडेटा) नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माहिती आणि पुराव्यासह संबंधित जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक यांच्याकडे किंवा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग आणि रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत जि. रायगड किंवा दोन्ही विभागातील पात्र शेतकऱ्यांनी संचालक विस्तार शिक्षण, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडे १३ एप्रिलपर्यंत हार्ड कॉपीद्वारे पाठवावी.

स्पर्धक शेतकऱ्यांची निवड शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी करण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!