मुख्य बातमी

प्रति झाड ५ हजार रुपये भरपाईसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा एल्गार

कोकणच्या हापूस उत्पादकांची थट्टा थांबवा, अन्यथा १५ मे रोजी 'वर्षा'वर धडकणार : रत्नागिरीत शेतकरी मेळावा संपन्न

रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. मुख्यमंत्री ज्या ‘वर्षा’ निवासस्थानी जेवण जेवतात, त्या एका ताटाची किंमत ३०० रुपयांहून अधिक असेल, मग शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून प्रति झाड २५० रुपये देणे ही क्रूर थट्टा आहे. जर १५ मे पर्यंत कोकणातील शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

रत्नागिरी येथील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित ‘शेतकरी एल्गार मेळाव्यात’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, प्रकाश (बावा) साळवी आणि नेहा माने यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्गातील अनेक नेते उपस्थित होते.

राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “संपूर्ण कोकणात दीड कोटींहून अधिक आंबा बागायतदार आहेत. अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मान्य नाही. बागायतदारांना प्रति झाड किमान पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, या मागणीवर त्यांनी जोर दिला. केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात मदत मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.”

यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनीही सरकारला धारेवर धरले. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी सरकारकडे कोट्यवधी रुपये उपलब्ध असतात, मग कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा उत्पादकांसाठी तिजोरी का उघडली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यंदा उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा वेळी खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावू नये, अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच वाशी मार्केटमधील दलाल आणि अडत्यांनी संगनमत करून दर पाडू नयेत, जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोकणच्या हापूसला जागतिक स्तरावर ‘जीआय’ टॅग मिळाला असला, तरी हवामान बदलाच्या संकटामुळे हापूसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व आंबा उत्पादकांनी आता संघटित होण्याची वेळ आली असून, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी १५ मे च्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले. या मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कोकणात आता आंबा प्रश्नावरून मोठे जनआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!