मुख्य बातमी

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १.२३ कोटींची फसवणूक; दिल्लीतील आरोपी जेरबंद

रत्नागिरी साइबर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात मोठी कारवाई करत दिल्लीतील एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींनी स्वतःला बंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील अधिकृत यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीला जाळ्यात ओढले होते.

फिर्यादी यांचे कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यामधून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची भीती आरोपींनी निर्माण केली. त्यानंतर त्यांना “डिजिटल अरेस्ट” करण्यात आल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादीकडून विविध व्यवहारांद्वारे एकूण १ कोटी २३ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेतला. या तपासादरम्यान दिल्ली-नोएडा येथील गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. पोलीस, सीबीआय, नॅशनल सिक्युरिटी विभाग किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून कोणी बँक खाते, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करत असेल, वैयक्तिक माहिती मागत असेल किंवा खाते पडताळणीच्या नावाखाली पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल तर अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!