मुख्य बातमी

डिजिटल अरेस्टप्रकरणी दिल्ली-नोएडा येथे सापळा रचून पकडलेल्या आरोपीच्या अटकेने तपासाला गती

रत्नागिरी : येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 02/2026 मध्ये तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांच्या “डिजिटल अटक” (Digital Arrest) सायबर फसवणूक प्रकरणाचा तपास यशस्वीपणे उघडकीस आणण्यात आला असून, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज यास ताब्यात घेण्यात आले आहे.

 

या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी मकरंद जोशी यांच्याशी संपर्क साधून स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी व अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासविले. फिर्यादी यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यामार्फत मानव तस्करी व मनी लॉन्डरिंगसारखे गंभीर गुन्हे झाल्याचे खोटे सांगून त्यांना भीती दाखविण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना डिजिटल अटक करण्यात आल्याचे भासवून सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले.

आरोपींनी फिर्यादी यांना तपासातून मुक्तता व कथित “सिक्युरिटी डिपॉझिट” या कारणाखाली विविध बँक खात्यांमध्ये एकूण १ कोटी २३ लाख इतकी रक्कम जमा करण्यास भाग पाडले. तपासादरम्यान फसवणूक झालेली रक्कम एका चॅरिटेबल ट्रस्टच्या बँक खात्यात वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना “सीएसआर डोनेशन” मिळवून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशात बोलावण्यात आले होते. तेथे त्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांची माहिती व धनादेश बळजबरीने मिळवून त्याद्वारे एक कोटी चार लाख रुपये इतक्या रकमेचा डिजिटल अपहार करण्यात आल्याचे समोर आले.

तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा, गोपनीय बातमीदारांचे जाळे व स्थानिक माहितीच्या आधारे तपास पथकाने गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याचा ठावठिकाणा नोएडा (उत्तर प्रदेश) येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार दिल्ली-नोएडा परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीला रत्नागिरी येथे आणून न्यायालयासमोर समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

यापूर्वी या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक केली असून त्याच्याविरुद्ध न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे. तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच इतर संशयितांविरुद्धही आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू असून तपास पुढे सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहा. पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या तपास पथकाने केली आहे.

पोलिसांचे आवाहन

कोणीही पोलीस अगर सीबीआय अधिकारी / नॅशनल सिक्युरिटी विभाग / इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे बँक अकाऊंट किंवा सिमकार्डचा गैरवापर झाला असून त्याकरीता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल. तर घाबरुन जाऊ नका. अकाऊंट व्हेरीफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक / बँक खात्यांची माहिती कोणालाही देवू नका व अशा धमक्यांना बळी पडू नका. तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाणे (8830404650) यांच्याकडे संपर्क करा. आर्थिक फसवणूक झाल्यास महाराष्ट्र सायबर क्राईम हेल्पलाईन क्र. १९३० यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!