रत्नागिरीत मान्सूनची दमदार हजेरी

रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापुरात मान्सूनचा पाऊस चांगलाच बरसला आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी सायंकाळी ५ ते ७ यादरम्यान रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले, तर रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. आज (९ जून) सकाळपासून रिमझीम पावसाने सुरुवात केली असून येत्या १० जूनपर्यंत जिल्ह्याला मुंबई वेधशाळेच्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
जिल्ह्यात तीन महिने उन्हाचे तापमान मोठ्या प्रमाणात होते. तब्बल ३८- ४२ अंशांपर्यंत तापमान गेले होते. दमट हवामान, उष्यामुळे रत्नागिरीकर हैराण झाले होते. मध्यंतरी अवकाळी पावसाने हजेरी लावली नागरिकांना एक दिवसाचा तात्पुरता दिलासा मिळाला त्यानंतर पुन्हा उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते . दरम्यान, जून महिन्यातसुरवातीलाच रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे उकाड्यापासून रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे.
पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, कोल्हापूर, रायगड, पालघर, अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ यासह विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



