‘एसआयआर’ अभियानात राज्यात प्रथम ठरलेल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या यशाबद्दल प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा सत्कार

चिपळूण : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) अभियानात २६५-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत १०० टक्के काम पूर्ण केल्याबद्दल मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानाच्या निमित्ताने चिपळूण येथील राधाताई लाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार झाला. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत घेतले, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी या ऐतिहासिक यशाचे श्रेय चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व बीएलओ तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना दिले. सर्वांच्या समन्वयातून आणि अहोरात्र परिश्रमातूनच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) अभियानात चिपळूण विधानसभा मतदारसंघाने १०० टक्के काम पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ३० जूनपासून बीएलओंनी घराघरांत जाऊन मतदार पडताळणी केली. चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ३३६ मतदान केंद्रांवरील २ लाख ७१ हजार ४३३ मतदारांच्या नोंदींचे पुनरीक्षण पूर्ण करण्यात आले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. ‘एसआयआर’ प्रक्रियेत २ लाख ४५ हजार ४८७ मतदारांचे इएफ डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, ८ ऑगस्टपर्यंत फेरपडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.


