लोटे एमआयडीसीतील कोका-कोला कंपनीत स्थानिक कामगारांना कमी केल्याचा आरोप
वैभव खेडेकरांचा आंदोलनाचा इशारा

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील कोका-कोला कंपनीत स्थानिक कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीने तालुक्यातील सुमारे आठ ते दहा स्थानिक भूमिपुत्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाबाबत जाब विचारला. स्थानिकांना रोजगार देण्याबाबत कंपनीने सामाजिक बांधिलकी जपावी आणि कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आठ दिवसांच्या आत पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मागणी मान्य न झाल्यास कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खेडेकर यांनी दिला. यावेळी त्यांनी स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे लोटे एमआयडीसीतील स्थानिक रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कंपनीकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. कंपनीकडून या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.



