शिवराज्याभिषेक सोहळा २०२६ : ६ जूनला रायगडावर ऐतिहासिक लोकोत्सव

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५२ वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून रायगडावर ५ व ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ६ जून १६७४ रोजी झालेला शिवराज्याभिषेक हा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन मानला जातो. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत.
यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा… स्वराज्याच्या इतिहासाचा’ तसेच ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
५ जून रोजी पाचाड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे उद्घाटन होणार असून त्यानंतर नगरप्रदक्षिणा, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम, तसेच होळीच्या माळावर युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. सायंकाळी ढोलवादन, मृदंग गजर आणि ‘जागर शिवशाहिरांचा’ या कार्यक्रमातून शिवचरित्राचा जागर घडविला जाणार आहे.
६ जून रोजी पहाटेपासूनच रायगडावर विविध धार्मिक व पारंपरिक विधींना सुरुवात होईल. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अभिषेक, राजसभेतील मानाचे विधी आणि सुवर्णमुद्रांचा अभिषेक पार पडणार आहे. त्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे शिवभक्तांना ऐतिहासिक परंपरेचा अनुभव घेता येणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीने राज्यभरातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नागरिकांना या ऐतिहासिक लोकोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रायगडाच्या पवित्र भूमीवर स्वराज्याच्या वैभवाचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे समितीने म्हटले आहे.


