कशेडी वजरवाडी येथे अपघात; चार प्रवासी जखमी

खेड : चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात गोवा येथील चार प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज (१७ जुलै) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील वजरवाडी येथे घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या (जीए-०६-के-०६१८) क्रमांकाच्या चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने कार रस्त्यालगत उभारलेल्या विद्युत दिव्याच्या खांबावर जोरदार आदळली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कारमधून प्रवास करणारे मनीषा केशव खवणेकर (वय ४४), केशव एकनाथ खवणेकर (वय ५१), स्वरा केशव खवणेकर (वय ५) आणि सुजाता महादेव कोचरेकर (वय ५७, सर्व रा. गोवा) हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका येथे २४ तास सेवेसाठी सज्ज असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी संस्थेच्या रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले. कशेडी वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले.

